नांदेड बंद दरम्यान शिंदेसेनेच्या आमदारांना मराठा आंदोलकांनी हुसकावले !

Foto
नांदेड : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड बंदची हाक देण्यात आली. या आक्रमक आंदोलनामुळे संपूर्ण नांदेड शहर कडकडीत बंद राहिले असून, मराठा आंदोलकांच्या तीव्र रोषाचा सामना सत्ताधारी लोकप्रतिनिधींना करावा लागला आहे.

आंदोलनाची ही रॅली तरोडा नाका तेथून पुढे आयटीआय चौकात आली असता, एक मोठी नाट्यमय घडामोडी घडली. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि आमदार आनंदराव बोंढारकर हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र, मराठा बांधवांच्या मनात सत्ताधार्‍यांबद्दल असलेला असंतोष या वेळी उफाळून आला.

आमदार येताच मराठा कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले. आंदोलकांनी दोन्ही आमदारांना घेराव घालत जागेवरच रोखले आणि त्यांना तीव्र विरोध दर्शवला. इथे फोटो काढायला आणि आंदोलनात सहभागी व्हायला कशाला येता? ताकद असेल तर सभागृहात जाऊन मराठा आरक्षणावर बोला! अशा शब्दांत आक्रमक कार्यकर्त्यांनी आमदारांची तीव्र कानउघाडणी केली आणि त्यांना आंदोलनातून बाहेर पडण्यास भाग पाडले.

कार्यकर्त्यांचा वाढता रुद्रावतार आणि आक्रमक पवित्र पाहताच दोन्ही आमदारांची चांगलीच पळताभुई थोडी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आमदारांनी तातडीने तेथून काढता पाय घेतला.
सकाळपासूनच आंदोलकांनी रस्त्यावर उतरून शहरात भव्य रॅली काढली. तरोडा नाका येथून या भव्य रॅलीला सुरुवात झाली. एक मराठा, लाख मराठाच्या गगनभेदी घोषणा देत मराठा बांधवांनी व्यापारी आणि दुकानदारांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापार्‍यांनीही आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली.

नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता; पोलीस बंदोबस्त तैनात
या घटनेनंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संताप दोन्ही ताणले गेले आहेत. शहरात ठिकठिकाणी टायर जाळून आणि घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, जरांगे पाटलांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.